Monday, July 6, 2015

25 वर्ष

दहावी पास होऊन यंदा 25 वर्ष झाली म्हणून...
जमलो आहोत आज सगळे आठवणींना गोळा करून...  
   
मुलांचे केस गेलेत.. पोट थोडं सुटलं आहे...
मुलींनीही 'वाढण्याचं' मनावर घेतलं आहे...
तरी सुद्धा आज आपल्या 'शाळेमध्ये' आलो म्हणून...             बाकांवरती बसु चला पुन्हा एकदा लहान होऊन...
       
रंग उडलाय भिंतींचा...फळे जुने झाले आहेत...
बाकांवरती कोरलेल्या खाणाखुणा मिटल्या आहेत...
मराठीच्या कविता अन् गणिताचे पाढे म्हणून...
डोक्यावरती घेऊ चला वर्ग आरडाओरडा करून...

डब्यामधला खाऊ कसा सगळे वाटून खात होतो...
एवढसं रबर सुद्धा नवीन म्हणून दाखवत होतो...
करूयात मोकळा गळा...सारखा कसा येतोय दाटून...             हसूयात आज खूप डबडबलेले डोळे मिटून...
                        
'बाई' जरा थकल्या आहेत 'सर' ही वाकले आहेत...
नावं आपली आठवण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत...           कान धरून त्याचवेळी शिक्षकांनी रागवलं म्हणून....
येऊ शकलो आज इथे कोणीतरी मोठे बनून...

मैदानातल्या मारामाऱ्या अन् एकमेकींच्या कागाळया...
गळून पडल्यात केव्हाच...पण मैत्री तेवढी उरली आहे...
शिक्षकांचे आशीर्वाद अन् सोबत्यांचा स्नेह घेऊन...
येत राहु शाळेत असेच, शाळेचे ऋण म्हणून...

 सुकृता पेठे- चिंचाळकर

No comments:

Post a Comment