Monday, July 6, 2015

गर्दीत एकटा मी

भासे जरी मजला, साथी मज अनेक,
गर्दीत त्या सख्यांच्या, असाच मी एक.
स्वीकारलो गेलो, असून मनाचा स्वामी,
तरीही अशा त्या, गर्दीत एकटा मी.
घायाळ मनाला, आसरा सवंगड्यांचा,
जाणीव स्पर्शिली, मी मोकळ्या मनाचा
पाझर भावनांचा, शिरकाव झाला वर्मी,
तरीही अशा त्या, गर्दीत एकटा मी.
भराऱ्या मनाच्या आता, घेतो स्वच्छंदी गगनी,
भार त्या परांचे माझ्या, साथीच घेतो पेलुनी.
सुमार त्या गगनाचा, भेटेल क्षितिजाठायी, 
नाहीच वाटे आता, गर्दीत एकटा मी.


संदीप कुलकर्णी

चाळीशी

वय म्हणजे काय, त्याची व्याख्या तरी कोणती?
वितळणारी मेणबत्ती, कि प्रकाशदायी पणती?

वय वाढलं म्हणजे नेमकं काय झालं?
वर्षाचा आकडा सरला, कि नवीन पान उलटलं?

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अशाच काहीशा मेंदूवरही होत्या,
लपवायची धडपड करायची, कि अजून वाढवायच्या?

टकलावरून हात फिरवून, म्हणायचं कशाला केस गेले?
वय झालं म्हणालं कोणी तर म्हणायचं, चार पावसाळे जास्त पाहिले

विशीतला तो तरुण आणि तिशीतला म्हणे प्रौढ
उमगेल का कधी हे वाढत्या वयाचं गूढ?


संदीप कुलकर्णी

कृष्ण लीला







































बारसं

Android घ्या कोणी Apple घ्या 
बारशाला आमच्या मात्र नक्की या 

गप्पांचं नाव ठेवतोय chat 
Notification ची बघतोय वाट 
सामान्य ज्ञानाला गुगल म्हणतोय 
मेंदूच्या  सुरकुत्या जरा कमी करतोय 
पत्राचं आम्ही email करतोय 
वाटायचे कष्ट तसे संपवून टाकतोय 

स्मृती नाव तसं चांगलं होतं 
अस्थित्व तिचं unlimited होतं 
तिलाच आता आम्ही memory म्हणतोय 
मोजमाप करून बंधनं लादतोय 

बारसं फक्त यांचचं नाहीये 
तर पाळण्याचाही charger झालाय 
कानात नाव सांगायचो आधी,
आता कानात पिन टोचू लागलोय 


संदीप कुलकर्णी

मैत्र जीवांचे!


25 वर्ष

दहावी पास होऊन यंदा 25 वर्ष झाली म्हणून...
जमलो आहोत आज सगळे आठवणींना गोळा करून...  
   
मुलांचे केस गेलेत.. पोट थोडं सुटलं आहे...
मुलींनीही 'वाढण्याचं' मनावर घेतलं आहे...
तरी सुद्धा आज आपल्या 'शाळेमध्ये' आलो म्हणून...             बाकांवरती बसु चला पुन्हा एकदा लहान होऊन...
       
रंग उडलाय भिंतींचा...फळे जुने झाले आहेत...
बाकांवरती कोरलेल्या खाणाखुणा मिटल्या आहेत...
मराठीच्या कविता अन् गणिताचे पाढे म्हणून...
डोक्यावरती घेऊ चला वर्ग आरडाओरडा करून...

डब्यामधला खाऊ कसा सगळे वाटून खात होतो...
एवढसं रबर सुद्धा नवीन म्हणून दाखवत होतो...
करूयात मोकळा गळा...सारखा कसा येतोय दाटून...             हसूयात आज खूप डबडबलेले डोळे मिटून...
                        
'बाई' जरा थकल्या आहेत 'सर' ही वाकले आहेत...
नावं आपली आठवण्याच्या कामामध्ये गुंतले आहेत...           कान धरून त्याचवेळी शिक्षकांनी रागवलं म्हणून....
येऊ शकलो आज इथे कोणीतरी मोठे बनून...

मैदानातल्या मारामाऱ्या अन् एकमेकींच्या कागाळया...
गळून पडल्यात केव्हाच...पण मैत्री तेवढी उरली आहे...
शिक्षकांचे आशीर्वाद अन् सोबत्यांचा स्नेह घेऊन...
येत राहु शाळेत असेच, शाळेचे ऋण म्हणून...

 सुकृता पेठे- चिंचाळकर